मारुतीची उपासना


 

 







हनुमान जयंतीला अन्य दिवसांच्या तुलनेत १ सहस्रपटीने मारुतितत्त्व कार्यरत असते. काही पंचांगांच्या मते हनुमान जन्मतिथी ही आश्‍विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो. हनुमान जयंती, मारुतीच्या जन्माचा इतिहास आणि मारुतीच्या उपासनेमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात केले आहे.  


जन्माचा इतिहास


राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) प्रदान केला होता. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात. वाल्मीकिरामायणात (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे – अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर ‘उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे’, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला ‘हनुमान’ हे नाव पडले.




हनुमान जयंती पूजाविधीविषयी


अ. हनुमंताचा जन्मोत्सव प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळी साजरा करतात.


आ. हनुमंताच्या मूर्तीचे किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.


इ. सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून पूजनाला प्रारंभ करावा.


ई. नैवेद्याला सुंठवडा (सुंठीचे आणि साखरेचे एकत्रित मिश्रण) ठेवू शकतो. त्यानंतर तो सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा.


उ. हनुमानासाठी रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार करावा.


ऊ. पूजनानंतर श्रीरामाची आणि हनुमंताची आरती करावी.


टीप : वरील पूजाविधी सर्वसाधारणपणे सगळ्यांना करता यावा यादृष्टीने सिद्ध (तयार) केला आहे. कोणाला जर षोडशोपचार पद्धतीने पूजा करता येत असेल तर ते त्याप्रकारे पूजाविधी करू शकतात किंवा काही ठिकाणी परंपरेप्रमाणे पूजाविधी ठरलेला असतो. ते त्याप्रमाणे पूजन करू शकतात.




प्रचलित पूजेतील प्रथा किंवा रुढीमागील कारणे


महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर आणि तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आढळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना म्हणून वाममुखी (डावीकडे तोंड असलेला) मारुति किंवा दासमारुति पूजेत ठेवतात.




मारुतीला शेंदूर, रुईची पाने-फुले वहाणे


ज्या वस्तूंमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच देवतेचे तत्त्व मूर्तीमध्ये येते आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात.


मारुतीला फुले वाहाण्याची पद्धत


हनुमानाच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे हनुमानाचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. यानुसार हनुमानाला फुले वहातांना पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, ती पाच किंवा पाचच्या पटीत वाहावीत.


मारुतीच्या पूजेत वापरायच्या उदबत्त्या


हनुमानाची पूजा करतांना हनुमानाचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणार्‍या केवडा, चमेली आणि अंबर या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात.


मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत


हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. या वेळी हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत, यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. 


मारुतीला प्रदक्षिणा घालणे


हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने हनुमानाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.


आध्यात्मिक त्रासापासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना करणे


हनुमान हा सर्वशक्‍तीमान असल्यानेच त्याला भूत, पिशाच, राक्षस, समंध इत्यादी कोणत्याही आसुरी शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते हनुमानाला काही करू शकले नाहीत. आसुरी शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी केलेली हनुमानाची उपासना म्हणूनच विशेष फलदायी ठरते. व्यक्‍तीला आसुरी शक्‍तींचा त्रास असल्यास तो दूर होण्यासाठी तिला हनुमानाच्या देवळात नेणे, तिने पाहिलेले तेल अन्य व्यक्‍तीने हनुमानाला वहाणे, त्रास असणार्‍या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे, तिला मारुतिस्तोत्र म्हणण्यास सांगणे, तिला हनुमानाचा नामजप करण्यास सांगणे, यांसारखे उपाय करता येतात.



शनीची साडेसाती आणि मारुतीची पूजा


शनीची साडेसाती न्यून (कमी) होण्यासाठी मारुतीची पूजा करतात. त्याचा विधी पुढे दिला आहे. एका वाटीत तेल घ्यायचे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा तोंडवळा पहायचा. मग ते तेल मारुतीला वाहायचे. एखादी रुग्ण व्यक्‍ती जरी मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला मारुतीची पूजा करता येते. तेलात तोंडवळ्याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा वाईट शक्‍तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्‍तीचा नाश होतो. खरा तेली शनिवारी तेल विकत नाही; कारण ज्या शक्‍तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी एखादा माणूस मारुतीला तेल अर्पण करत असेल, ती शक्‍ती तेल विकणार्‍याला त्रास देण्याची शक्यता असते; म्हणूनच मारुतीच्या देवळाबाहेर बसलेल्याकडून तेल विकत न घेता तेल घरून नेऊन अर्पण करावे.


नामजप


देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप. देवतेच्या नामजपाने देवतेचे तत्त्व जास्तीतजास्त ग्रहण होण्यासाठी, नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे आवश्यक असते. हनुमान जयंती या दिवशी हनुमानतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. त्याचा लाभ घेण्यासाठी त्या दिवशी मारुतीचा ‘श्री हनुमते नम: ।’ हा जप अधिकाधिक करावा.


मारुतिस्तोत्राचे पठण


समर्थ रामदासस्वामींचा १३ कोटी रामनामाचा जप पूर्ण झाल्यावर मारुति त्यांच्यासमोर प्रगट झाला आणि त्या दर्शनानंतर स्वामींनी मारुतिस्तोत्र (भीमरूपीस्तोत्र) रचले. या स्तोत्रात रामदासस्वामींनी विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती केली आहे. हे स्तोत्र पठण करणार्‍याला धनधान्य, पशूधन, संतती या सार्‍याचा आणि उत्तम रूपविद्यादीकांचा लाभ होतो. या स्तोत्राच्या पठणाने भूत, पिशाच, समंध आदी वाईट शक्‍तीची बाधा; सगळे रोग, व्याधी (त्रिविध ताप) नष्ट होतात, तसेच मारुतीच्या दर्शनाने सारी चिंता दूर होऊन आनंदाची प्राप्ती होते, अशी फलश्रुती या स्तोत्रात दिलेली आहे. 


मारुतीची आरती


मारुतीची (हनुमंताची) आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.


मारुतिगायत्री


आञ्जनेयाय विद्महे । वायुपुत्राय धीमहि । तन्नो वीरः प्रचोदयात् ।। 


अर्थ : आम्ही अंजनीपुत्र मारुतीला जाणतो. वायूपुत्र मारुतीचे ध्यान करतो. तो वीरमारुति आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.


मारुतीला करावयाच्या काही प्रार्थना !


हे मारुतिराया, तू जशी श्रीरामचंद्राची दास्यभक्‍ती केलीस, तशी भक्‍ती मलाही करण्यास शिकव. 


हे मारुतिराया, धर्मरक्षणासाठी तू मला भक्‍ती आणि शक्‍ती दे. 


हे मारुतिराया, तू जसे रामनामाच्या बळावर अधर्मी असुरांना मारलेस, तसे आता चालू असलेल्या धर्म-अधर्माच्या लढ्यात आम्हाला ‘साधना’ म्हणून राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांचे कार्य करता येण्यासाठी आशीर्वाद अन् बळ दे !   



बलोपासना करून हनुमंताची कृपा संपादा !


धर्म-अधर्म यांच्या लढ्यातील महत्त्वाचे दैवत म्हणजे हनुमंत ! हनुमंताने त्रेतायुगात रावणाविरुद्धच्या युद्धात प्रभु श्रीरामास सहकार्य केले, तर द्वापरयुगात महाभारताच्या घनघोर युद्धात तो कृष्णार्जुनाच्या रथावर विराजमान होता. हिंदुस्थानात मोगली सत्ता अत्याचाराचे थैमान घालत होत्या, त्या वेळी महाराष्ट्रात बलोपासना रुजवण्यासाठी समर्थ रामदासस्वामींनी हनुमंताच्या मूर्तींची ११ ठिकाणी स्थापना केली आणि हिंदूंमध्ये ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले.


संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘मारुति’

( उल्हास प्रभात बदलापुर )


( ulhas prabhat badlapur )